शंख
॥ ॐ पंचजन्याय विद्महे पद्मगर्भाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात ॥
!! ॐ पंच जन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात !!
!! त्वं पुरा सागरोत्पन्न विष्णुना विधृत: करे। निर्मित: सर्वदेवैश्च पाञ्चजन्य नमोऽस्तु ते !!
शंखाची उत्पत्ती देव-दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून झाली. त्या वेळी जे चौदा रत्ने प्रकट झाली, त्यातील एक महत्त्वाचे रत्न म्हणजे शंख. शंखाला महालक्ष्मीचा भाऊ मानले जाते. भगवान विष्णू, महालक्ष्मी व इतर अनेक देवता शंखाला आपले आयुध म्हणून धारण करतात.शंखाला अष्टसिद्धी व नव निधी यांमध्ये एक विशिष्ट स्थान आहे. विजयघोषाचे प्रतीक म्हणून शंख सनातन हिंदू धर्मात मांगलिक चिन्ह मानले जाते.
शंखाचा धार्मिक आणि आध्यात्मिक महिमा:-
प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी शंखध्वनीचा वापर वैदिक, तांत्रिक व धार्मिक पूजा-पाठात केला आहे. आरती, होम, हवन, विवाह, गृहप्रवेश, वास्तुशांती, मुंज, नामकरण यासारख्या सर्व शुभकार्यांमध्ये शंखध्वनी आवश्यक मानला जातो. शंखाची पूजा केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही.ज्या घरात दररोज शंखध्वनी होतो, तेथे वास्तुदोष, दारिद्र्य, दुःख आणि नकारात्मकता दूर होते.
शंखाचे उल्लेख आणि नावे:-
शंखाला विविध पुराणांमध्ये आणि संहितांमध्ये स्थान दिले गेले आहे. उदा. –अथर्ववेद, ब्रह्मवैवर्त पुराण, गरुड पुराण, श्रीमद्भागवत गीता इत्यादी.
शंखाचे विविध नावे अशी आहेत:-
समुद्रज, कंबु, सुनाद, पावनध्वनी, त्रिरेख, अर्णवभव, विष्णूप्रिय, महानाद, मुखर, दीर्घनाद, बहुनाद, हरिप्रिय, धवल, स्त्रीविभूषण इत्यादी.
शंखाचे वैज्ञानिक व आरोग्यदायी फायदे:-
शंखध्वनीच्या नादवैज्ञानिक आणि आयुर्वेदिक फायदे देखील आहेत. प्राचीन काळातच ऋषीमुनींनी याचा अभ्यास केला होता.
शंखध्वनीचा नियमित सराव केल्यास खालील त्रासांवर उपयोग होतो –
- हृदयरोग
- उच्च किंवा कमी रक्तदाब
- दमा, अस्थमा व श्वसनाचे त्रास
- थायरॉईड
- गॅसेस, अॅसिडिटी
- मानसिक तणाव व चिंता
शंखध्वनी केल्याने मनोकामना पूर्ण, मन व आत्मा स्थिर, आत्मबल वाढणे, आणि संपूर्ण वातावरण शुद्ध व सकारात्मक होते.
शंखध्वनीचे आध्यात्मिक महत्त्व:-
प्रत्येक युगात – सतयुगापासून ते आजपर्यंत, शंखाला युद्धभूमीपासून मंदिरापर्यंत आदराने स्थान मिळाले आहे.
शंखध्वनी जसा श्रद्धा व आस्थेचा भाव निर्माण करतो, तसाच तो युद्धात जोश व उत्साह वाढवतो.
शंखध्वनी हे यश, कीर्ती, प्रतिष्ठा, आरोग्य, संपत्ती, समृद्धी व सौभाग्य प्राप्त करून देणारे साधन आहे.
भारतीय ऋषीमुनींनी शंखध्वनीचे गूढ समजून घेतले व त्याला मंत्ररूप दिले. त्यांच्या मते, शंखध्वनीत अखिल ब्रह्मांडाचे संक्षिप्त रूप सामावलेले आहे. हे एक प्रकारे प्राकृतिक ऊर्जा आणि सूक्ष्म शक्तींचे प्रकट रूप आहे.