शालेय शंखवादन प्रशिक्षण उपक्रम
“घर घर शंखनाद – हर घर शंखनाद”
भारतीय संस्कृती, परंपरा आणि नादोपासनेचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या शंखवादन कलेचे संवर्धन, प्रशिक्षण व पुढील पिढीपर्यंत प्रसार करण्याच्या उद्देशाने श्रीमंत केसरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शालेय स्तरावर शंखवादन प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.
शंख ही केवळ धार्मिक परंपरेशी जोडलेली वस्तू नसून, भारतीय संस्कृतीमध्ये नाद, साधना आणि उपासनेशी जोडलेले एक प्राचीन वाद्य आहे. विद्यार्थ्यांना या प्राचीन कलेची शास्त्रबद्ध ओळख करून देणे आणि नियमित सरावाच्या माध्यमातून त्यांचे कौशल्य विकसित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
प्रशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट
शालेय शंखवादन प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना शंखवादनाचे तंत्र शिकविण्यासोबतच श्वसनाचा योग्य वापर, नियमित सराव, शिस्त, एकाग्रता, आत्मविश्वास, नादाची जाण आणि भारतीय संस्कृतीची ओळख यावर विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून प्रगत स्तरापर्यंत टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देऊन त्यांना शंखवादनातील विविध कौशल्ये आत्मसात करण्याची संधी दिली जाते.
तीन भागांमध्ये शास्त्रबद्ध प्रशिक्षण
शालेय शंखवादन प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तीन स्वतंत्र भागांमध्ये विभागण्यात आला आहे. प्रत्येक भागासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती व सराव समजण्यासाठी स्वतंत्र अभ्यास पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या अभ्यासक्रमामध्ये शंखवादनाच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणासोबत शंख, नाद, श्वसन आणि भारतीय नादोपासनेशी संबंधित विविध विषयांचा अभ्यास करून घेतला जातो.
शंख परिचय, प्राणायाम व शंखनाद प्रशिक्षण भाग – १
या भागात विद्यार्थ्यांना शंखाची ओळख, शंख धरण्याची योग्य पद्धत, शंखवादनाची प्राथमिक तंत्रे, श्वसनाचा योग्य वापर आणि शंख प्राणायामाची माहिती दिली जाते. तसेच ॐकार सराव, श्वासाचे नियंत्रण आणि नियमित सरावाची पद्धत यांचा परिचय करून दिला जातो.
शंखध्वनी कौशल्य, हस्तमुद्रा व ताल-लय प्रशिक्षण भाग – २
या भागामध्ये शंखवादना सोबत विविध हस्तमुद्रांची माहिती व त्यांचा अभ्यास, नादोपासनेची संकल्पना व माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली जाते. शंखवादन करताना श्वास, नाद आणि शरीराची स्थिती यांचा योग्य समन्वय साधण्यावर भर दिला जातो.
चक्रसाधना आधारित शंखध्वनी प्रावीण्य प्रशिक्षण भाग – ३
या भागामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शंखध्वनींचे प्रशिक्षण, तसेच शरीरातील सात चक्रांची त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती आणि शंखध्वनीतील विविधता समजावून दिली जाते. तसेच शंखाच्या नादातून मंत्रोच्चार कसा करावा, नादामध्ये उच्चार, लय आणि श्वास यांचा योग्य समन्वय कसा साधावा, याचे मार्गदर्शन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ शंख फुंकण्यापुरते मर्यादित न राहता शंखनादाचे विविध प्रकार आणि त्यामागील साधना समजून घेण्याची संधी मिळते.
स्वतंत्र अभ्यास पुस्तिका
प्रशिक्षण अधिक शिस्तबद्ध आणि अभ्यासपूर्ण व्हावे यासाठी प्रत्येक प्रशिक्षण भागासाठी स्वतंत्र अभ्यास पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या पुस्तिकांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी आवश्यक माहिती, शंख प्राणायाम, ॐकार सराव, हस्तमुद्रा, शरीरातील सात चक्रांची माहिती, विविध शंखध्वनी, शंखवादनाची पद्धत तसेच शंखध्वनीतून मंत्रोच्चार यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणा सोबत वाचन व स्व-अभ्यासाचीही सवय लागण्यास मदत होते.
शाळेसोबत घरातील सराव
शंखवादन ही नियमित सरावातून विकसित होणारी कला आहे. त्यामुळे शाळेमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी घरीही नियमित सराव करणे महत्त्वाचे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रोत्साहन द्यावे आणि शक्य असल्यास विद्यार्थ्यांसोबत स्वतःही शंखवादनाचा सराव करावा. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळून शंखवादनाची कला घराघरात पोहोचण्यास मदत होईल.
प्रशिक्षणानंतर परीक्षा व स्पर्धात्मक वाटचाल
शालेय शंखवादन प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचे मूल्यमापन करण्यासाठी शंखवादन परीक्षा घेण्यात येईल.त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य आणि प्रगतीनुसार स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल.
स्पर्धेची प्रस्तावित रचना:
१. इयत्तानिहाय शंखवादन स्पर्धा
विद्यार्थ्यांच्या इयत्तेनुसार स्पर्धा आयोजित करून त्यांना आपल्या कौशल्याचे सादरीकरण करण्याची संधी दिली जाईल.
२. वर्गनिहाय / शाळास्तरीय स्पर्धा
शाळेतील विविध वर्गांमधून विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन शाळास्तरावर शंखवादनाला प्रोत्साहन दिले जाईल.
३. आंतरशालेय शंखवादन स्पर्धा
विविध शाळांमध्ये शंखवादन प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून आंतरशालेय शंखवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.
यामुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य मोठ्या व्यासपीठावर सादर करण्याची, इतर विद्यार्थ्यांकडून शिकण्याची आणि स्पर्धात्मक अनुभव मिळविण्याची संधी मिळेल.
संस्कृती, प्रशिक्षण आणि स्पर्धा यांचा संगम
शालेय शंखवादन प्रशिक्षण हा केवळ एक वाद्य शिकविण्याचा उपक्रम नसून भारतीय संस्कृतीचे संवर्धन, प्राचीन कलेचे प्रशिक्षण, नियमित सराव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठीचा एक उपक्रम म्हणून राबविण्यात येत आहे.
शाळेपासून सुरुवात करून प्रशिक्षण → परीक्षा → इयत्तानिहाय/वर्गनिहाय स्पर्धा → आंतरशालेय शंखवादन स्पर्धा अशा टप्प्यांमधून विद्यार्थ्यांना शंखवादनाची शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण वाटचाल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
.