previous arrow
next arrow

                                                     श्रीमंत केसरी प्रतिष्ठान — गौरवगाथा

“घर घर शंखनाद – हर घर शंखनाद” या ध्येयवाक्याला केंद्रस्थानी ठेवून भारतीय संस्कृती, परंपरा आणि प्राचीन पौराणिक वाद्यांचे जतन, संवर्धन व प्रसार करण्याचा संकल्प घेऊन श्रीमंत केसरी प्रतिष्ठानची स्थापना झाली.

शंख हा केवळ धार्मिक वाद्य नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि नादपरंपरेचा अमूल्य वारसा आहे, या विचारातून प्रतिष्ठानने शंखवादनाच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाला व्यापक स्वरूप दिले. बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना प्रशिक्षण देत शंख, शिंगी, डमरू, झांज, तुतारी, दफली, संबळ, नगारा अशा प्राचीन वाद्यांची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू केले.

या कार्याला व्यापक स्वरूप देताना प्रतिष्ठानने पहिल्या विभागीय शंखवादन स्पर्धेचे आयोजन करून शंखवादन कलेला स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विविध संस्था व संघटनांनी प्रेरणा घेत शंखवादनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली.

या यशस्वी वाटचालीचे पुढचे पाऊल म्हणजे पहिली राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धा व शंख प्रदर्शन. महाराष्ट्राच्या विविध भागांतून शंखवादकांना एकत्र आणत शंखवादन कलेला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देण्याचा ऐतिहासिक उपक्रम प्रतिष्ठानने साकारला. या माध्यमातून शंखनादाची परंपरा जपण्याबरोबरच ती नव्या पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मानाचा विक्रम नोंदविण्याचा बहुमानही प्राप्त झाला. हा सन्मान केवळ प्रतिष्ठानचा नसून भारतीय शंखनाद परंपरेचा गौरव आहे.

महाराष्ट्रभर शंखवादन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा संकल्प

पहिल्या राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धेच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर शंखवादनाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. शंखवादनाची ही कला केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रातील प्रत्येक भागात पोहोचावी, अधिकाधिक विद्यार्थी व नागरिकांनी शंखवादन शिकावे आणि या प्राचीन नादपरंपरेचा प्रचार व प्रसार व्हावा, हा या संकल्पामागील उद्देश आहे.

या कार्यासाठी शंखवादनाचे प्रशिक्षण घेऊन पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींनी आपापल्या भागात प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत, यासाठी श्रीमंत केसरी प्रतिष्ठानच्या वतीने आवश्यक मार्गदर्शन व योग्य ते सहकार्य करण्यात येईल. हे कार्य संस्कृती संवर्धन आणि शंखवादनाच्या प्रसारासाठी सेवाभावी भावनेने करण्याचा संकल्प असून, या कार्यासाठी कोणतेही मानधन दिले जाणार नाही.

ज्यांना ही जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारून आपल्या भागात शंखवादन प्रशिक्षण वर्ग सुरू करायचा आहे, त्यांनी प्रतिष्ठानशी संपर्क साधावा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शंखनाद घुमविण्याच्या या सांस्कृतिक चळवळीत प्रत्येकाने सहभागी व्हावे, हीच अपेक्षा.

या कार्याची पुढील भव्य दिशा म्हणून २०२७ मध्ये “पहिली आंतरशालेय शंखवादन स्पर्धा” आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांना शंखवादन, भारतीय संस्कृती आणि आपल्या प्राचीन नादपरंपरेशी जोडून हा संस्कार महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचविण्याचे प्रतिष्ठानचे ध्येय आहे.

विभागीय स्पर्धेपासून राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत, राज्यस्तरीय व्यासपीठापासून महाराष्ट्रभर प्रशिक्षण वर्गांपर्यंत आणि आता शाळा-शाळांमधून नव्या पिढीपर्यंत—हा आहे श्रीमंत केसरी प्रतिष्ठानच्या गौरवशाली वाटचालीचा संकल्पमय प्रवास.

असंख्य विद्यार्थी, पालक, प्रशिक्षक, कार्यकर्ते, संस्था आणि हितचिंतक यांच्या सहकार्याने ही वाटचाल अधिक बळकट होत आहे.

!! पौराणिक वाद्यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था  !!

!! परंपरा, संस्कृती, सेवा आणि ऐक्याचे  प्रेरणास्थान !!

!! राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धेचे आयोजन करणारी आद्य, ऐतिहासिक आणि विक्रमी संस्था  !!

श्रीमंत केसरी प्रतिष्ठान – पुणे 

                                                                                         !! घर घर शंखनाद हर घर शंखनाद !!